विलीनीकरणासाठी भाजपशी चर्चा अपेक्षित; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेने संभ्रम

Foto
मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असती वा तारीख ठरली असती तर अजित पवारांनी नक्कीच आमच्याशी चर्चा केली असती. शरद पवार व अजितदादांमध्ये काही चर्चा झाली असल्यास त्याची आमच्याकडे माहिती नाही. विलीनीकरण करायचे वा कोणता निर्णय घ्यायचा हा सर्वस्वी राष्ट्रवादीचा अधिकार आहे. फक्त विलीनीकरणाचा निर्णय घेण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने भाजपची चर्चा करणे अपेक्षित आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडल्याने विलीनीकरणावर संभ्रम वाढला आहे. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेने भाजप राष्ट्रवादीच्या विलीनीकरणास अनुकूल नाही हेच सूचित होते.

अजित पवार व माझे अत्यंत सलोख्याचे संबंध होते. ते सर्व गोष्टींमध्ये माझ्याशी चर्चा करायचे. सर्व बाबी ते मला सांगायचे. अगदी त्यांच्या विमान अपघाताच्या आदल्या दिवशी आम्ही जवळपास एक तास गप्पा मारल्या होत्या. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात असती वा तारीख ठरली असती तर त्यांनी आम्हाला नक्कीच त्याची माहिती दिली असती, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी १२ तारखेला राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घोषणा होणार होती हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा दावा खोडून काढला.

अजित पवार अशा प्रकारच्या चर्चा करत होते तर ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) किंवा सरकारमधून बाहेर पडण्याची चर्चा करीत होते का ? उलट अजितदादा सरकारमध्ये स्थिर होते. दररोज काहीतरी संभ्रम निर्माण करून आपले ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करणे हे योग्य नाही असा टोलाही त्यांनी शरद पवारांना लगावला. मला अनेक गोष्टी माहिती आहेत वा मी त्याचा साक्षीदार आहे. पण त्यावर मी काही मतप्रदर्शन करणार नाही व आम्हाला राजकारण करायचे नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

वित्त खाते तूर्तास मुख्यमंत्र्यांकडे

उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांना शपथ देण्याचा निर्णय राष्ट्रवादी पक्षाचा होता. अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया जटिल असल्याने आणि सुनेत्राताई नव्यानेच मंत्री झाल्या असल्याने तूर्तास अर्थ खाते आपल्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात आला असून अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर याबाबत पुढील निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रचारातून माघार

सध्याच्या परिस्थितीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात उतरावे असे योग्य वाटत नाही. निवडणुका येतात जातात. आमचा पक्षदेखील सक्षम आहे. पक्ष योग्य पद्धतीने या निवडणुका लढवेल. जाहीर सभा करायच्या आणि त्याच्यामध्ये शेवटी काही राजकीय वक्तव्येदेखील होतात. ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रचाराला न जाण्याचा निर्णय घेतल्याचे फडणवीस यांनी सांगितले.